Pages

Wednesday, June 23, 2010

खेकडा भजी

पुण्यातली असूनही माझ्या आवडीची अशी एक गोष्ट म्हणजे खेकडा भजी! माझ्या शंकेखोर तृणभक्षी मित्रांना शंका येवू नये म्हणून सांगावेसे वाटते की ही फक्त कांद्यापासून बनवली जातात, खेकड्या सारखी दिसतात म्हणून यांना खेकडा भजी म्हणतात. सिंहगडावर ट्रेकला (किंवा आणि कशा कशाला :) ) जे जातात त्यांना ही भजी ठाऊक असतीलच. मित्रांसोबत किंवा प्रिय व्यक्ति सोबत गड चढावा व दमलेल्या जिवाला मडक्याच्या दह्याने शांती द्यावी जोडीला झुणकाभाकर व खेकडा भजी ! वाह क्या बात है। पण असा योग अशात अनुभवायलाच मिळत नाही. म्हणून चेकाळून जाऊन मी ही भजी बनवली. खूप सोपी आहेत. बिघडली तर तुम्ही कमाल आहात.

कृती:

१ दोन मोठे कांदे उभे बारीक चिरावेत.कांद्याच्या पाकळ्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत.
२. आवडीनुसार तिखट १ किंवा २ चमचे, अर्धा चमचा हळद, मीठ व चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकावे.(मोहन म्हणाजे सुसाट गरम केलेले तेल).
३. हिरवी मिर्ची मिक्सर मधून काढून त्यात टाकू शकता, या मुळे भजी झणझणीत होतात.
४. हे मिश्रण कमित कमी २० मिनिटं झाकून ठेवा. कांद्याला पाणी सुटेल.
५. बाहेरून पाणी अजिबात न टाकता पाणी सुटलेल्या कांद्यामध्ये बेसन टाकून मिश्रण कालवून घ्या.
६. खेकड्याच्या आकाराचे मिश्रण गरम तेलात सोडा व खमंग तळून घ्या.


गड नाही म्हणून विसरता का तुम्ही रोमॅन्स?
भजी बनवून आता म्हणा निल्याला थॅंक्स !