Pages

Sunday, September 26, 2010

वडापाव


पाणीपुरी इतकच मी कुठल्या पदार्थाला मिस करत असेल तर तो आहे आपला वडापाव! शाळा सुटल्यावर आम्ही सगळे मित्र समांतर सायकल चालवत लोखंडे सरांच्या ट्यूशनला जात असू. जाता जाता सिग्नल कँपला वैद्यच रेस्टॉरेंट होतं. तिथे आम्ही कधी मित्राच्य पैशावर कधी टीटीएमएम करुन वडापाव खायचो. आठवडाभरात एक दोनदातरी काही तरी तिकडम करुन तीन रुपये जमवायचे व शेवटी वैद्यबुवांना अर्पण करायचे हा आमचा नेम असे.वैद्यबुवांचा वडापाव हा अमचा पहिला वडापाव. त्या सोबत जी काही चटणी तिची आठवण मनात अजून तरंगते.

तर वैद्यबुवांना स्मरुन आज आपण वडापाव करणार आहोत.

वड्याचं सारण
१. चार पाच मोठे बटाटे डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये टाका. ७-८ मिनिटं ठेवा. हाताने दबतील इतकी उकडल्यावर सोलून कुस्ककरुन एखाद्या पसरट भांड्यात ठेवा.
२. ५-६ हिरव्या मिरच्या (थाई मिरच्या वापरणाअर असाल तर बिनधास्त ७-८ घ्याव्यात), लसणाचा एक अख्खा गड्डा,थोडं आलं व कोथिंबीर मिक्सर मधून काढून घ्या,
३. फ्राईंग पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात मोहरी हिंग हळद जिरे टाकून फोडणी करावी.
४. फोडणीत मिक्सर मधून काढलेले मिरची लसाणाचे मिश्रण टाका.
५. नंतर कुस्करलेले बटाटे त्यात टाकावेत. बटाट्याला सगळीकडून फोडणी लागेल असं चांगलं मिक्स करुन घ्यायचं
६. चवीपुरतं मीठ व थोडा लिंबू पिळा. थोड्यावेळाने गॅस बंद करा व मिश्रण थंड होवू द्या.
७. थंड झाल्यावर छोटे छोटे गोळे तयार करा.

आवरण
१. अर्धी वाटी बेसन (किती वडे तळणार त्यानुसार हे प्रमाण बदलेल) एका भांड्यात घ्या. त्यात चवीपुरतं मीठ थोडी हळद व एक चिमूट खाण्याचा सोडा टाकावा व पाणी टाकून सारखं करुन घ्याव. बेसनाच्या गाठी राहू नयेत या तर बेसिक गोष्टी आहेत. पीठ अती घट्ट असेल तर वडा कडक बनतो. व अतीपातळअसेल तर तळता येत नाहीत. पाणी किती टाकायचं याची एक सोपी परीक्षा म्हणजे मिश्रणात बोट बुडवून ते वर उचलाव. पीठ बोटाला चिकटून राहू नये व चटकन खाली ओघळूही नये इतकं पाणी ओताव.

२.एक चमचा तेल गरम करुन यात टाका. (मोहन)

वडे तळणे:
शक्यतो छोटी कढई घ्या म्हणजे तेल कमी लागेल. वडा पूर्णपणे बुडेल इतकं तेल घ्याव. एकेका गोळा तयार केलेल्या बेसनाच्या आवरणात बुडवून तळून काढावा. सोपं आहे.

एखाद्या छोट्याकडईत एकचमचा तेल टाकून त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या तळाव्यात. नंतर मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकाव. बन मध्ये लसणाची चटणी पसरवून घ्यावी व त्यावर वडा ठेवा. आणि काय आपल्या आवडत्या वडापावाचा घास घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा !

पाच रुपये देवून वडापाव आयता आपल्या तोंडात टाकण्यासारखी मजा कशातच नाही राव! पण हेही नसे थोडके.

हां पण एक घास वडापावचा आणि एक मिर्चीचा घ्यायला विसरू नका. मिर्ची शिवाय वडापाव म्हणजे संत्र्याशिवाय नागपूर, गर्दीशिवाय मुंबई, समुद्राशिवाय कोकण, मुख्यमंत्र्याशिवाय मराठवाडा आणि खवचटपणा शिवाय पुणे आहे !

Saturday, August 14, 2010

थालिपीठ

माझा लहानपणापासूनचा आवडता पदार्थ म्हणजे थालिपीठ ! घरातले सगळे पंगतीला बसलेले आणि आईच्या हातचं थालिपीठ. क्या बात है! मला अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला होतं ते चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं की. मग काय? थालिपीठ एवढं खावसं वाटायला लागतं की विचारू नका. माझ्यासाठी मग थालिपीठ खाणं चवीपुरतं न राहता आठवणी जिवंत करण्याचं साधन ठरतं.
गेल्या कित्येक वर्षात घरी निवांत राहून आईच्या हातचे पदार्थ खाण्याचा योग आला नाही. म्हणून स्वत:च ते साकारायचा प्रयत्न करतो.

थालिपीठ



मी जे थालिपीठ करणार आहे ते भाजणीचं नाही. साधंच झटकीपट तयार होणारं आहे.

साहित्य: ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ, तेल, ओवा(नसला तरी चालतो)




कृती:

एकदम पर्फेक्ट चवीसाठी प्रमाण महत्त्वाचं असतं.२ वाट्या ज्वारीचं पीठ, १ वाटी गव्हाचं पीठ व अर्धी वाटी डाळीचं पीठ (बेसन) या प्रमाणात मिसळून घ्यावेत. चवीपुरतं मीठ,१ किंवा दोन चमचे लाल तिखट पिठात मिसळावं, अगदी थोडा ओवा (पचण्यासाठी)टाका. त्यानंतर थोडं थोडं पाणी पिठात मिसळून मिश्रण तिंबावं. फार जास्त पाणी सुरुवातीलाच घालू नये.
ज्वारीचं पीठ जुनं असेल तर गरम पाणी वापरावं. कोथिंबीर व कांदा बारीक चिरून मिश्रणात टाकलं की झालं.

मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. एका माणसाच्या जेवणाला दोन थालिपिठं पुरतात. त्या हिशोबाने गोळे करावेत. व हातावर गोल फिरवून, कटिंग बोर्ड्वर किंवा परातीत थापून घ्यावीत. मी डायरेक्ट तव्यावरच थापतो. थापताना चार बोटांनी वजन देऊन व एकाच दिशेने थापावे. (क्लॉक वाईज किंवा अ‍ॅंटी क्लॉक वाईज एक काय ते ठरवून घ्या व नंतर तसेच थापा)
थापून गोल आकार बनवून घ्या. सगळीकडे समान जाडी व्हावी. तव्यावर किंव सपाट बुडाच्या कढईत तेल सोडावे. त्यावर थापलेले थालिपीठ टाकावे. बोटाने वाफ जाण्यासाठी चार पाच भोके पाडावीत. त्यात तेल सोडावे. मध्यम आचेवर गॅस चालू कारावा व वाफ सुटणार नाही असे थोडेसे घट्ट झाकण तव्यावर किंवा सपाट बुडाच्या कढईवर लावावे. एखादी थाळी पालथी घालून काम होत असेल तरी उत्तम. पाच मिनिटं होवू द्या. सारखे सारखे थालिपीठ झाले की नाही? करपले की काय अशा शंका उपस्थित करुन थाळ उघडून बघू नका. अशाने वाफ निघून जाते व थालिपीठ नीट होत नाही.बास पाच मिनिटांनी वाफ सुटल्यावर आत्मविश्वासाने थाळ बाजुला काढा फर्स्टक्लास थालिपीठ तयार झालेले असेल.

लोणी, लोणचे, दही शेंगादाण्याची चटणी काय वाट्टेल त्यासोबत खा !

Wednesday, June 23, 2010

खेकडा भजी

पुण्यातली असूनही माझ्या आवडीची अशी एक गोष्ट म्हणजे खेकडा भजी! माझ्या शंकेखोर तृणभक्षी मित्रांना शंका येवू नये म्हणून सांगावेसे वाटते की ही फक्त कांद्यापासून बनवली जातात, खेकड्या सारखी दिसतात म्हणून यांना खेकडा भजी म्हणतात. सिंहगडावर ट्रेकला (किंवा आणि कशा कशाला :) ) जे जातात त्यांना ही भजी ठाऊक असतीलच. मित्रांसोबत किंवा प्रिय व्यक्ति सोबत गड चढावा व दमलेल्या जिवाला मडक्याच्या दह्याने शांती द्यावी जोडीला झुणकाभाकर व खेकडा भजी ! वाह क्या बात है। पण असा योग अशात अनुभवायलाच मिळत नाही. म्हणून चेकाळून जाऊन मी ही भजी बनवली. खूप सोपी आहेत. बिघडली तर तुम्ही कमाल आहात.

कृती:

१ दोन मोठे कांदे उभे बारीक चिरावेत.कांद्याच्या पाकळ्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत.
२. आवडीनुसार तिखट १ किंवा २ चमचे, अर्धा चमचा हळद, मीठ व चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकावे.(मोहन म्हणाजे सुसाट गरम केलेले तेल).
३. हिरवी मिर्ची मिक्सर मधून काढून त्यात टाकू शकता, या मुळे भजी झणझणीत होतात.
४. हे मिश्रण कमित कमी २० मिनिटं झाकून ठेवा. कांद्याला पाणी सुटेल.
५. बाहेरून पाणी अजिबात न टाकता पाणी सुटलेल्या कांद्यामध्ये बेसन टाकून मिश्रण कालवून घ्या.
६. खेकड्याच्या आकाराचे मिश्रण गरम तेलात सोडा व खमंग तळून घ्या.


गड नाही म्हणून विसरता का तुम्ही रोमॅन्स?
भजी बनवून आता म्हणा निल्याला थॅंक्स !


Tuesday, May 11, 2010

मुगाचे भजे

लहानपणी मावशीकडे हिंगोलीला गेलो की तिथे रामलीला मैदानात मिळणारे मूगभजे खाणे हा खूप आकर्षणाचा भाग असायचा. मावसभावा सोबत त्याच्या गाडीवर बसून भजे खायला जाताना खूप भारी वाटायचे. तिथले ते गरमागरम भजे आणि चिंचेचं गोड पाणी अजूनही लहानपणच्या आठवणी जागं करतात ! त्याच आठवणींना थोडा उजाळा म्हणून आज मूगभजे केले.

कृती: आदल्या दिवशी किंवा आठ तास आधी मुगाची डाळ भिजत ठेवावी. मिक्सर मधून काढून घ्यावी. तदनंतर जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर लसूण बारीक वाटून किंवा मिक्सर मधून काढून घ्यावी. डाळीत हे टाकून वर थोडी हळद, हिंग व मीठ घालावे. मिश्रण तयार.(बेसन मिसळायची आवश्यकता नाही)

आता तेल गरम करुन भजे तळावेत. फारच सोपी कृती आहे. हिरव्या मिरच्या अंदाजा पेक्षा २-३ जास्तच घ्याव्यात म्हणेज भजे एकदम खमंग होतात. चिंचेच्या गोड पाण्यासोबत मस्त लागतात.