गेल्या कित्येक वर्षात घरी निवांत राहून आईच्या हातचे पदार्थ खाण्याचा योग आला नाही. म्हणून स्वत:च ते साकारायचा प्रयत्न करतो.
थालिपीठ

मी जे थालिपीठ करणार आहे ते भाजणीचं नाही. साधंच झटकीपट तयार होणारं आहे.
साहित्य: ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ, तेल, ओवा(नसला तरी चालतो)
कृती:
एकदम पर्फेक्ट चवीसाठी प्रमाण महत्त्वाचं असतं.२ वाट्या ज्वारीचं पीठ, १ वाटी गव्हाचं पीठ व अर्धी वाटी डाळीचं पीठ (बेसन) या प्रमाणात मिसळून घ्यावेत. चवीपुरतं मीठ,१ किंवा दोन चमचे लाल तिखट पिठात मिसळावं, अगदी थोडा ओवा (पचण्यासाठी)टाका. त्यानंतर थोडं थोडं पाणी पिठात मिसळून मिश्रण तिंबावं. फार जास्त पाणी सुरुवातीलाच घालू नये.
ज्वारीचं पीठ जुनं असेल तर गरम पाणी वापरावं. कोथिंबीर व कांदा बारीक चिरून मिश्रणात टाकलं की झालं.
मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. एका माणसाच्या जेवणाला दोन थालिपिठं पुरतात. त्या हिशोबाने गोळे करावेत. व हातावर गोल फिरवून, कटिंग बोर्ड्वर किंवा परातीत थापून घ्यावीत. मी डायरेक्ट तव्यावरच थापतो. थापताना चार बोटांनी वजन देऊन व एकाच दिशेने थापावे. (क्लॉक वाईज किंवा अॅंटी क्लॉक वाईज एक काय ते ठरवून घ्या व नंतर तसेच थापा)
थापून गोल आकार बनवून घ्या. सगळीकडे समान जाडी व्हावी. तव्यावर किंव सपाट बुडाच्या कढईत तेल सोडावे. त्यावर थापलेले थालिपीठ टाकावे. बोटाने वाफ जाण्यासाठी चार पाच भोके पाडावीत. त्यात तेल सोडावे. मध्यम आचेवर गॅस चालू कारावा व वाफ सुटणार नाही असे थोडेसे घट्ट झाकण तव्यावर किंवा सपाट बुडाच्या कढईवर लावावे. एखादी थाळी पालथी घालून काम होत असेल तरी उत्तम. पाच मिनिटं होवू द्या. सारखे सारखे थालिपीठ झाले की नाही? करपले की काय अशा शंका उपस्थित करुन थाळ उघडून बघू नका. अशाने वाफ निघून जाते व थालिपीठ नीट होत नाही.बास पाच मिनिटांनी वाफ सुटल्यावर आत्मविश्वासाने थाळ बाजुला काढा फर्स्टक्लास थालिपीठ तयार झालेले असेल.
लोणी, लोणचे, दही शेंगादाण्याची चटणी काय वाट्टेल त्यासोबत खा !
No comments:
Post a Comment