Pages

Sunday, September 26, 2010

वडापाव


पाणीपुरी इतकच मी कुठल्या पदार्थाला मिस करत असेल तर तो आहे आपला वडापाव! शाळा सुटल्यावर आम्ही सगळे मित्र समांतर सायकल चालवत लोखंडे सरांच्या ट्यूशनला जात असू. जाता जाता सिग्नल कँपला वैद्यच रेस्टॉरेंट होतं. तिथे आम्ही कधी मित्राच्य पैशावर कधी टीटीएमएम करुन वडापाव खायचो. आठवडाभरात एक दोनदातरी काही तरी तिकडम करुन तीन रुपये जमवायचे व शेवटी वैद्यबुवांना अर्पण करायचे हा आमचा नेम असे.वैद्यबुवांचा वडापाव हा अमचा पहिला वडापाव. त्या सोबत जी काही चटणी तिची आठवण मनात अजून तरंगते.

तर वैद्यबुवांना स्मरुन आज आपण वडापाव करणार आहोत.

वड्याचं सारण
१. चार पाच मोठे बटाटे डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये टाका. ७-८ मिनिटं ठेवा. हाताने दबतील इतकी उकडल्यावर सोलून कुस्ककरुन एखाद्या पसरट भांड्यात ठेवा.
२. ५-६ हिरव्या मिरच्या (थाई मिरच्या वापरणाअर असाल तर बिनधास्त ७-८ घ्याव्यात), लसणाचा एक अख्खा गड्डा,थोडं आलं व कोथिंबीर मिक्सर मधून काढून घ्या,
३. फ्राईंग पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात मोहरी हिंग हळद जिरे टाकून फोडणी करावी.
४. फोडणीत मिक्सर मधून काढलेले मिरची लसाणाचे मिश्रण टाका.
५. नंतर कुस्करलेले बटाटे त्यात टाकावेत. बटाट्याला सगळीकडून फोडणी लागेल असं चांगलं मिक्स करुन घ्यायचं
६. चवीपुरतं मीठ व थोडा लिंबू पिळा. थोड्यावेळाने गॅस बंद करा व मिश्रण थंड होवू द्या.
७. थंड झाल्यावर छोटे छोटे गोळे तयार करा.

आवरण
१. अर्धी वाटी बेसन (किती वडे तळणार त्यानुसार हे प्रमाण बदलेल) एका भांड्यात घ्या. त्यात चवीपुरतं मीठ थोडी हळद व एक चिमूट खाण्याचा सोडा टाकावा व पाणी टाकून सारखं करुन घ्याव. बेसनाच्या गाठी राहू नयेत या तर बेसिक गोष्टी आहेत. पीठ अती घट्ट असेल तर वडा कडक बनतो. व अतीपातळअसेल तर तळता येत नाहीत. पाणी किती टाकायचं याची एक सोपी परीक्षा म्हणजे मिश्रणात बोट बुडवून ते वर उचलाव. पीठ बोटाला चिकटून राहू नये व चटकन खाली ओघळूही नये इतकं पाणी ओताव.

२.एक चमचा तेल गरम करुन यात टाका. (मोहन)

वडे तळणे:
शक्यतो छोटी कढई घ्या म्हणजे तेल कमी लागेल. वडा पूर्णपणे बुडेल इतकं तेल घ्याव. एकेका गोळा तयार केलेल्या बेसनाच्या आवरणात बुडवून तळून काढावा. सोपं आहे.

एखाद्या छोट्याकडईत एकचमचा तेल टाकून त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या तळाव्यात. नंतर मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकाव. बन मध्ये लसणाची चटणी पसरवून घ्यावी व त्यावर वडा ठेवा. आणि काय आपल्या आवडत्या वडापावाचा घास घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा !

पाच रुपये देवून वडापाव आयता आपल्या तोंडात टाकण्यासारखी मजा कशातच नाही राव! पण हेही नसे थोडके.

हां पण एक घास वडापावचा आणि एक मिर्चीचा घ्यायला विसरू नका. मिर्ची शिवाय वडापाव म्हणजे संत्र्याशिवाय नागपूर, गर्दीशिवाय मुंबई, समुद्राशिवाय कोकण, मुख्यमंत्र्याशिवाय मराठवाडा आणि खवचटपणा शिवाय पुणे आहे !

1 comment: